Thursday, July 23, 2015

"माई पाया पडतो"

लागून आलेल्या सुट्टीमुळे आम्हा मित्रामध्ये कुठेतरी भटकंती ठरली अन संध्याकाळी हफिसातूनच परस्पर निघायचे असा बेत झाला.आता कॅमेरा,लेन्स व गरजेपुरते एखाद दोन कपडे अश्याने तयार झालेली आमची थोडीशी वजनी सॅक कशाला उगाच हाफिसात मिरवत न्या (तशी बहुतेक दर वीकएंडला डेस्क शेजारी आमची सॅक "नसली" तर काहीं लोक "अरेच्या ह्यावेळी घरीच वाटते !!! अशे शेरे मारणार ही परिस्थिती) म्हणून एका मित्राच्या कुठल्यातरी दूरच्या पण स्टेशन जवळ एका चाळीत घर असलेल्या त्याच्या एका नातेवाईकाकडे सॅक सकाळी टाकून संध्याकाळी पिक-अप करण्याची सोय करून घेतली. सकाळी त्यांच्याकडे बॅग ठेवायला गेलो तर तिथले काका पूजेत मग्न होते. त्यांनी इशार्यानेच " तिथे ठेव … काळजी करून नकोस " असे मंत्र पुटपुटत मला खुणावले. त्यांनी सांगितलेल्या जागेवर मी सॅक टाकली व आपला रीतसर नमस्कार वगैरे करून निघालो.
संध्याकाळी परत सॅक पिक-अप करायला त्यांच्या घरी पोचलो.दार उघडेच होते आणि मला दारात बघून सोफ्यात बसलेल्या आजीबाई लगबगीने पुढे आल्या व आमची जन्मजन्माची ओळख असल्याकत हसून मला म्हणाल्या "ये ये तुझी बॅग न्यायला आलायेस होय … ये बस". मी आजींना म्हणालो आजी उशीर झालाय त्यामुळे बसत नाही.मला मधेच थांबवत आजी म्हणाल्या "अरे पहिल्यांदाच घरी आलायस,सरबत पिऊनच जा.आणि मी करून ठेवलय तुझ्यासाठी. बैस घटकाभर". मी मुकाट्यान सोफ्यात बसतच होतो तो आजीने माझ्या समोर एक थंडगार कोकम सरबताचा प्याला धरलेला मला दिसला.मोठ्या कृतज्ञतेणे मी ते सरबत प्यालो आणि जाण्या करता उभा राहिलो तो आजीने माझ्या हातात दोन रव्याचे लाडू कोंबले "जाता जाता खा हो …ये " काय म्हणावे ह्या माउलीच्या प्रेमाला. मी आजीला नमस्कार केला व सॅक उचलून दरवाज्यातून बाहेर पडता पडता आजीचे शब्द कानावर पडले "सावकाश रे बाळ.पोहोचशील वेळेत,सावकाश जा,ये ये". खोल मनात काही तरी चटकून गेलं. मी वळलो व दारात उभ्या असलेल्या आजीच्या पायाला स्पर्श केला "माई पाया पडतो". आशीर्वाद देत आजी पुटपुटल्या "आयुष्यमान भव,सदा सुखी रहा…" 
बाहेर आलो आणि वर आकाशाकडे नजर गेली "…परमेश्वरा असेच आशीर्वाद असू दे रे बाबा… अजून काय हवय आयुष्यात …

No comments: