Wednesday, March 23, 2022

केएरटेकर

 


आमच्या एका मित्राने काही दिवसापूर्वी वसईतील एका जिल्हा परिषद शाळेच्या पुरातन अश्या वास्तूच एक छायाचित्र इथे फेसबुकवर पोस्ट केले होते. खूप वर्ष्यापुर्वी मी ती वास्तू बघितलेली मला पुसटशी आठवली.म्हणून मी फोन करून त्याला त्या जागेच नेमक स्थान विचारून येत्या रविवारी फेरी मारायचा विचार  केला.रविवारची सुट्टी असल्यामुळे शाळेत कोणी नसेल व मनसोक्त फोटाग्राफी होईल अशा आशेने मी तिथे पोहोचलो. पोहोचल्यावर बघतो तो कंपाऊंडच्या दोन्ही गेटला भली मोठी कुलुपं लागलेली होती. बाइक वळवली व दुसऱ्या ठिकाणी बघूया म्हणून निघालो पण मन मानायला तयार न्हवतं व कंपाऊंडवरून उडी मारून आत शिरु असा विचार करून एक चक्कर मारून परत तिथेच पोहोचलो. रस्त्याच्या कडेला बाइक पार्क करून आतमध्ये कसा काय शिरता येईल ह्या विचारात असताना लक्षात आले कि छोटा गेट फक्त कडी लावूनच बंद केला आहे.कडी सरकवून आत शिरलो व सवयीनुसार खाली बसून एखाद दोन फोटो काढले असतील तोच  इमारतीच्या एका कोपऱ्यातून मागच्या बाजूतून एक माणूस बाहेर आल्याचा जाणवल. हातात एक प्लास्टिकची  बादली घेऊन तो झाडांना पाणी देत होता. मी उठून त्याला नमस्कार वगैरे करून विचारल "तुम्ही इथले केएरटेकर वगैरे आहेत का ?" त्या गृहस्थाने बारीक स्मितहास्य करून मला एक परतप्रश्न करून गुगलीच फेकली.म्हणाला भाई  ह्या पृथीवर आपण सर्वजण केएरटेकरच नाही का ? त्याचा उत्तर ऐकून मी तीन ताड उडालोच . ह्याला आता काय बोलावे तेच मला कळेना. शेवटी तोच पुढे बोलू लागला...." मी इथे  समोरच राहतो... मला झाडं खूप आवडतात...कुलुपाची चावी माझ्याकडेच असते... दररोज मीच ह्या झाडांना पाणी देतो .....आपण आता जी काही फळे खातो ती कोणीतरी लावली असणार, पाणी देऊन त्यांची काळजी घेऊन संगोपन केल असणार...त्यांच्या मेहनतीचीच फळे तर आपण सगळे खातो..मी पण माझा खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न करतो .... तुम्ही निवांत फोटो काढून घ्या.. झालं कि मला सांगा तोवर मी पाणी देऊन घेतो ... .तुम्हाला ठाऊक आहे का की स्वातंत्र काळात ह्या शाळेत गांधीजी येऊन गेलेत!!!!....

बोलता बोलता बरच काही बोलून आणि शिकवून गेला हा माणूस...आजच्या ह्या व्यवहारी जगात असले विरळ का होईना पण थोडेसे हिरे अजून आपल्या अवतीभवती आहेत हि भावना थोडी दिलासा देऊन गेली .