Monday, April 4, 2022

माणुसकी.....

गेल्या रविवारी काही मित्राबरोबर एका प्रसिद्ध अश्या  दूकानात लस्सी पिण्यासाठी  गेलो होतो.ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्र  बाहेर खुरच्यावर बसून चेष्टा मस्करी करीत होतो‌. तेवढ्यात ७५-८० च्या वयाची एक म्हातारी आजी पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली.वाकलेली कंबर,चेहऱ्यावर सुरकुत्यांच जाळ पसरलं होतं, डोळे पाणीदार पण खोल गेले होते. खांद्यावरून एक झोळी लटकत होती.कपडे जुने पण स्वच्छ होते. 

त्या आजीला बघून न जाणो मनात काय आलं की मी पैसे काढण्यासाठी खिशात घातलेला हात परत घेऊन विचारले "आजी लस्सी पिणार का?"माझ्या अश्या विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंभित झाले.ह्याला अचानक काय झालं अश्या नजरेने माझ्याकडे बघू लागले. 

आजी ने मानेनेच होकार दर्शवला व आपल्या जवळ जमा झालेली नाणी आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यापुढे धरली. मला काही समजले नाही, म्हणून मी तिला विचारलं, "हे कशासाठी?"

"हे मिळवून माझ्या लस्सीचे पैसे द्या दादा !"

मी तिला हातानेच रहुद्या म्हणून बोललो व दुकानदाराला एक लस्सी वाढविण्यास सांगितले.आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व ती जवळच जमिनीवर बसली.आता तिला खुर्चीवर बसायला सांगायचं विचार होता पण मी लाजलो.मित्र काय म्हणतील,बाजूला बसलेले वा दुकानदार तिला खुर्चीवर बसून देतील का अश्या विचाराने मी गप्प बसलो.

पण आजीला जमीनीवर बसलेली पाहून मला परत खुर्चीवर बसवेना म्हणून मी तसाच उभा राहिलो.आपल्या आधुनिक जगात माणसाची काय किंमत आहे व ती कशावर अवलंबून आहे ते न कळण्याइतका मूर्ख मी नक्की नव्हतो.माणुसकी फक्त पैश्यावर अवलंबून राहीली आहे की काय अश्या एक ना अनेक विचारांनी मनात थैमान घातल होत. मिनिटा मिनिटाला मनात वादळं उठत होती. 

"साब लस्सी"... दुकानातील पोर मला ग्लास देत सांगत होता...माझ्या तंद्रीतून मी जागा झालो व पोराच्या हातून दोन ग्लास उचलून म्हाताऱ्या आजीच्या हातात एक ग्लास देऊन मी तिच्या बाजूला जवळच जमीनीवर बसलो. आता हे करण्यास मी स्वतंत्र होतो व त्यावर कुणाला आपत्ती असण्याचे कारण नव्हते. तिथे हजर असलेल्या माझे २-३ मित्र काही सांगण्यासाठी पुढे आले देखील.....

.. पण ते माझ्यापर्यंत पोचण्या वा काही बोलण्याच्या आगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि हसत माझ्याकडे बघून, हात जोडून म्हणाला,

"वर वर बसा साहेब! माझ्याकडे  गिऱ्हाईकं तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो !

आपण आज थोडस माणूस बनण्यासाठी प्रयत्न करू या का.... 🙏